परिनिर्वाण दिवस २९ मे
माईसाहेब डॉ. सविता भिमराव आंबेडकर :-
**********************************
अनेक शिल्पकार ,थोर समाजसुधारक होवून गेलेत.या थोर समाजसुधारकांना घडविण्यात महिलांची निर्माती म्हणून भूमिका अनन्यसाधारण ठरते.
" प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एका स्त्रीचे साथ असतेच."
बाबासाहेबांना रमाई गेल्यानंतर माईसाहेब आंबेडकरांनी देखील बाबासाहेबांची सावलीसारखी साथ दिली. मालवत्या ज्योतिची ऊर्जा म्हणून त्या अखंड कार्यरत राहिल्या. ज्या ज्या वेळेस बाबासाहेबांनी महिलांना वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले .त्या त्या वेळेस महिलांनी सक्रीय सहभाग दिला. माईसाहेबांनी बाबासाहेब या मालवणार्या ज्योतीला आपल्या वैद्यकीय ऊर्जेचे इंधन देऊन अधिक प्रकाशमान केले.
माईंचा आयुष्याचा प्रवास हा सर्वसाधारण स्त्री प्रमाणे नव्हताच .ती एका असामान्य बुध्दीमान स्त्री ची तेजस्वी वाटचाल होती.ती ही त्या काळातल्या सनातनी ,कर्मठ समाजात.
माईंचे पूर्वीचे नांव शारदा कबीर .त्यांचे मूळ गांव रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात असलेले, डोले गाव. वडिल कृष्णराव विनायकराव कबीर व आई जानकीबाई. माईसह पाच बहिणी व तीन भाऊ अशी आठ भावंडे होती.वडिल नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाले होते. ते मुंबई प्रांताच्या आरोग्य खात्यातील औषधी विभागात अधीक्षक पदावर कार्यरत होते. इंडियन मेडिकल कौन्सिलचे रजिस्ट्रार म्हणूनही त्यांनी काम पाहिले.माईसाहेबांचा जन्म २७ जानेवारी १९१२ रोजी मुंबईत झाला.पुण्यात त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे परशुरामभाऊ महाविद्यालय, नंतर फर्ग्युसन महाविद्यालयात इंटर सायन्स पूर्ण केले. मुंबईच्या मेडिकल कॉलेज मधून १९३७ मध्ये त्या एम.बी.बी.एस. झाल्या. नंतर त्यांनी एम.डी. केले. गुजरात मधील एका रूग्णालयात त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. मात्र तेथील हवामान न मानवल्यामुळे शेवटी नोकरीचा राजीनामा देऊन त्या मुंबईला परतल्या. डॉ .मालवणकरांकडे ज्युनियर डॉक्टर म्हणून त्यांनी प्रैक्टिस ची सुरूवात केली. माईसाहेब व डॉ.बाबासाहेबांची पहिली भेट विर्लेपार्ले (मुंबई ) येथे१९४७ च्या सुरूवातीस डॉ.व्हि.के.राव यांच्या घरी झाली .बाबासाहेबांची प्रकृती चांगली राहत नव्हती . बाबासाहेब औषधोपचाराच्या निमित्ताने डॉ.राव कडे गेले असता या पार्श्वभूमीवर माईसाहेब व त्यांची भेट झालेली होती. डॉ .राव यांनी बाबासाहेबांना डॉ .मालवणकरांकडून ऊपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे डॉ. मालवणकरांकडे डॉ.सविता कबीर माईसाहेबांना बाबासाहेबांची सेवा करण्याची संधी मिळाली. बाबासाहेब तेव्हा डायबेटीस, न्यूरायटीस, संधीवात आणी रक्तदाब या आजारांनी ग्रस्त होते . मधुमेहाच्या आजारा मुळे त्यांना रोज जेवणापूर्वी इन्सुलिनचे इंजक्शन आणि डॉक्टर च्या सल्ल्यानुसार वेळोवेळी औषधी घ्याव्या लागयच्या. संधीवात व गुडघेदुखीच्या त्रासामुळे त्यांना निट चालायलापण त्रास व्हायचा. काठीचा आधार घेऊनच त्यांना बसल्यावर उठता येई. तेव्हा त्यांच्या आयुष्यात रमाई देखील नव्हत्या, त्यांचे निधन होवून सात वर्ष झाली होती. एकाकीपणामुळे तसेच सतत च्या दगदगी मुळे फक्त औषधोपचारांनी बाबासाहेबांची प्रकृती स्थिरावत नव्हती. रमाई नंतर अनेक मित्रांनी बाबासाहेबांना दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला होता.संपूर्ण समाजाने डॉ.आंबेडकरांना बाबासाहेब हि पदवी बहाल केलेली असल्यामुळे दुसरा विवाह करणे बाबासाहेबांना अमान्य होते. दुसरीकडे माईसाहेबांना डॉक्टर म्हणून बाबासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत नव्हती.माईसाहेबांनी आपल्या व्यवसायातील प्रामाणिक पणा जपण्यासाठी बाबासाहेबांना घरी येऊनच ऊपचार करून देण्याची इच्छा व्यक्त केली परंतु बाबासाहेबांना संपूर्ण महिलांच्याच मानसन्मानाची विशेष काळजी असल्यामुळे तसेच कधी दिल्ली तर कधी मुंबईत वास्तव्य रहात असल्यामुळे आणि एका डॉक्टर ची नितांत गरज लक्षात घेवुन त्यांनी माईसाहेबांना डॉ. राव च्या मध्यस्थीने सरळ विवाहाचीच मागणी घातली. तेव्हा राज्यघटनेची राष्ट्रीय जबाबदारी बाबासाहेबांवर होती, ते ऐतिहासिक कार्य करण्यासाठी त्यांच्या प्रकृतीची आणी औषधोपचाराची जिकरीने काळजी घेणे अत्यावश्यक होते, परिस्थितिचे गांभीर्य ओळखुन तसेच अविवाहीत असल्यामुळे माईसाहेबांनी बाबासाहेबांच्या विवाहाच्या मागणीला होकार दिला. त्या मुबंईहून दिल्लीला गेल्या. बाबासाहेबांसोबत माईसाहेबांचा विवाह १५ एप्रिल १९४८ रोजी नोंदणी पध्दतीने दिल्लीत झाला.
विवाहानंतर माईसाहेबांनी बाबासाहेबांच्या शरीर प्रकृतीची सर्वतोपरी काळजी घेतली .माईसाहेबांनी जसे घर आणि बाबासाहेबांचे आरोग्य व्यवस्थित सांभाळले तसेच दिल्लीतील सामाजिक कार्यक्रमांमध्ये देखील माईसाहेब सहभागी होत असत. परंतु कधी कधी बाबासाहेबांना माईसाहेबांची गरज पडली व त्या ईतरत्र बाहेर असल्या की त्यांची गैरसोय व्हायची, व बाबासाहेब, माईसाहेबांवर चिढायचे, परंतु सामाजिक कार्यक्रमातील माईसाहेबांच्या भाषणांमुळे तर बाबासाहेब विशेष आनंदी होत असत. बाबासाहेबांनी या काळात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.महत्वाच्या लिखाणाची कामगिरी पार पाडली. या काळात माईंनी पत्नी म्हणून त्यांची अहोरात्र सेवा केली. राज्य घटनेचा मसूदा तयार करणे, कायदामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणे, हिंदू कोड बिल तयार करणे , क्रांति व प्रतिक्रांती, बौध्द राष्ट्रांमध्ये धम्माचा प्रचार प्रसार ,"बुध्द आणी त्यांचा धम्म" ग्रंथ या पुस्तकांच्या लेखन कार्यात फक्त सहचारिणी म्हणून माईसाहेबांनी बाबासाहेबांची सोबत दिली नाही तर आपले पत्नीधर्म, आपली सामाजिक जबाबदारी देखील त्या सांभाळीत होत्या . हिंदू कोड बिल मध्ये महिलांविषयक कोणकोणत्या तरतूदी असाव्यात याविषयी आणी भारतीय घटनेतील प्रत्येक कलमावर माईसाहेब बाबासाहेबांसमवेत चर्चा करीत असत. बरेचदा बाबासाहेब सांगतील त्याचा कच्चा मसुदा लेखन माईसाहेब लिहून काढ़ीत. बौध्द धम्माचा धर्मांतर सोहळा तर माईसाहेबांच्या हट्टामुळेच बाबासाहेबांच्या ढासळत जाणाऱ्या प्रकृतीची काळजी घेत घेत घडून आला अशी विशेष व मोलाची कामगिरी माईसाहेबांनी सांभाळली.माईसाहेबांनी केवळ आपल्या आजारी पतीची जबाबदारी आपल्या शिरावर वाहिली नाही तर त्या भारतीय घटनेच्या घटनाकाराला आयुष्य वाढवून देणारी नि भारतीय स्त्रीयांना आपले हक्क अधिकार बहाल करणारी प्रमुख प्रेरणास्त्रोत होत्या. त्यांना बाबासाहेबांची साथ शेवटचे फक्त आठच वर्षे लाभली १९४८ ते १९५६ पर्यंत.
डाॅ. बाबासाहेबांच्या निर्वाणाविषयीचे गूढ अजूनही उलगडले नव्हते .जेव्हा बाबासाहेबांची प्रकृती खूपच खालावत चालली होती, माई बाबासाहेबांना भेटायला येणार्यानां प्रकृतीच्या काळजीने बाबासाहेबांशी सरळ भेटु देण्याचे टाळायच्या, (फेब्रुवारी १९५६) या काळात बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांचा व इतर लोकांचा सवितामाईंकडे बघण्याचा दृष्टिकोन बाबासाहेबांना भेटू देत नसल्यामुळे द्वेषाचा होऊ लागला होता. नंतरच्या काळात सवितामाईंविषयी लोकांचा द्वेषभावनेचा दृष्टिकोन दृढ होत गेला.विशेषत: बाबासाहेबाच्यां निकटच्या कार्यकर्त्याचां.
१९४८ नंतर माईसाहेबांच्या मदतीने बाबासाहेबांनी केलेल्या अनेक कार्यांपैकी काही महत्वपूर्ण कार्य पुढीलप्रमाणे १) हिंदू कोडबील ची निर्मिती
२) The untouchable अस्पृश्य पूर्वी कोण होते, हा ग्रंथ लिहिला.
३) भारताची राज्यघटना निर्मिती.
४) दिल्लीत आंबेडकर भवनची कोनशिला बसविली.
५) पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे कॉलेज उभारणी.
६) बुध्द उपासना पाठ ही बुध्द वंदनेची पुस्तिका प्रकाशित केली.
७) मुंबईतून राज्यसभेवर बाबासाहेबांची निवड.
८) मुंबईत सिध्दार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स ऍण्ड इकॉनॉमिक्स सुरु केले.
९) रंगून, ब्रम्हदेश येथे जागतिक बौध्द परिषदे साठी गेले.
१०) परराष्ट्रीय धोरणाविषयी विचार मांडले.
११) देहू रोड(जि.पुणे ) येथे बुध्द विहाराचे उद्घाटन केले.
१२) भारतीय बौध्द महासभा (दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) या संस्थेची त्यांनी मुंबईत स्थापना केली.
१३) मुंबई राज्य कनिष्ठ गाव कामगार असोसिएशन या संस्थेची स्थापना त्यांनी मुंबईत केली.
१४) थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ प्रकाशित झाला.
१५) जनता पत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण केले.
१६) भारतातील लोकशाहीचे भवितव्य या विषयावर बाबासाहेबांनी भाषण केले.
१७) मुंबईत विधी महाविद्यालय सुरु केले.
१८) आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स या संस्थेची स्थापना केली.
१९) नागपूर येथे बाबासाहेबांनी आपल्या पत्नीसह बौध्द धम्माची दीक्षा घेतली. व आपल्या लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दीक्षा दिली.
२०) बुध्द आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला.
२१) बुध्द आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ लिहिला.
२२) क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ लिहिला.
माईसाहेब आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे जे योगदान आहे ते बाबासाहेबांच्या चाहत्यांनी मान्य करायलाच हवे. त्या बाबासाहेबांच्या जीवनात आल्या, त्यांनी बाबासाहेबांची काळजी घेतली म्हणून बाबासाहेब काही वर्षे जगू शकले. १९४८ च्या नंतर बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचे काही श्रेय माईसाहेबांना नक्कीच देता येईल...
१९४८ पासून बाबासाहेबांच्या जीवनात त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सवितामाई नसत्या तर कदाचित बाबासाहेबांच्या हातून वरील सर्व महत्त्वपूर्ण कार्ये पूर्ण झालीच नसती....!
बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतरही माईसाहेब स्वस्थ बसलेल्या नव्हत्या .बाबासाहेबांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्या धडपडतच होत्या.पुणे स्थित सिम्बाँयसिस संस्थेत माईसाहेबांच्या प्रयत्नाने व संस्थेचे प्रमुख डॉ.मुजुमदार यांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऊभे राहिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षात माईसाहेबांनी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांच्याकडे महू ते महाड रेल्वे मार्गाची मागणी केली होती. महू दिक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी मुंबई असा मार्ग सुचविण्यात आला होता.माईसाहेबांच्या प्रयत्नांमुळेच महू येथील जन्मस्थळाची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निश्चित होऊ शकली. माईसाहेब आपल्या कतृत्वाने महान ठरल्या आहेत. भारत सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मरणोत्तर 'भारत रत्न' किताबाने गौरव केला,त्यावेळी डॉ.बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून माईसाहेबांनी हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला, त्यावेळी माईसाहेब निश्चितच कृतार्थ झाल्या असतील यात शंका नाही.माईसाहेबांचे दिर्घ आजाराने २९ मे २००३ ला दुःखद निधन झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची मालवती ज्योत प्रज्वलित करणाऱ्या या ज्ञानज्योतीचा समाजाकडून ऊपेक्षित आणी अवहेलना सोसणाराच हा अंत होता..
माईसाहेबांच्या कृतिशिल आणी त्यागपूर्ण आयुष्यास त्यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन आणी साश्रू नयनांनीच मानाचा जयभिम!!
*************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा