रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.
सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते
एकदा बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेब धारवाडच्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले.
ते वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही. त्यावेळी वराळे म्हणाले ती लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत.
वराळे अगदी कंठ दाटून ते म्हणाले, त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देवून म्हणाल्या तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या. मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेवून जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून येतात आणि लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. खूप आनंदी राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते.तिचा आनंद गगनात मावत नव्हता.मग त्यावेळी हि सगळी लहान मुले रमाबाई यांना "रमाआई" म्हणून बोलायला लागतात. आणि त्या क्षणा पासून रमाबाई हि माता रमाई झाली. आणि ती सगळ्यांची आई झाली.
रमाईची शरिर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.
अशा पददलितांच्या आई - रमाईंचे २७ मे १९३५ रोजी वयाच्या ३७व्या वर्षी निधन झाले. माता रमाईंना आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र श्रद्धांजली...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा