मुख्य सामग्रीवर वगळा

आई का केलीस पाठवणी माझी ?

आई का केलीस पाठवणी माझी ?
                               
              
 आजही ती एकटीच जेवत होती. नवरा,सासू,सासरे सगळ्यांची जेवण होऊन भांड्यांचा थर बेसिनमध्ये साचला होता. दोन वर्षांच्या लेकराला तासभर मागे पळून चार घास भरवून झोपवलं होतं. दिवसभर काम आणि मुलामागे  धावपळ करून करून कंभर दुखत होती. पायातून मुंग्या येत होत्या. अंगातील त्राण निघून गेल्यासारखं वाटून अशक्तपणा डोके वर काढत होता. 
 
काहीही न खाता फक्त शांत पडावस वाटत होतं पण भांड्यांचा ढिगारा समोर दिसत होता. मुलासाठी चार घास पोटात घालणं गरजेचेच होतं. तसही हे दुखणं रोजचच होतं... कोणाला सांगायचं आणि कोण समजून घेणार होतं?? अंग तापाने फणफणत असो की चक्कर येत असो की हाताला चटका बसलेला असो की अजून काय पण कामाला सुट्टी कधीच नव्हती. त्यात मला काही त्रास होतोय म्हणून तोंड पाडून बसलं तर अजूनच कप्प्यातल्या शब्दसुमनांचा वर्षाव व्हायचा. कितीही त्रास होत असला तरी आवढा मनातच गिळून ठसठसत्या दुखण्यासहित घरच्यांच्या पोटासाठी चूल पेटवायला लागायची. ही पोट भरली की आपापल्या जागी आसनस्थ होऊन झोपेच्या अधीनही व्हायची. जिने आपल्याला खायला घातलं त्या अन्नपूर्णाने स्वतः काही खाल्लं का, तिला काही हवंय का हे कोणाच्या डोक्यातही कधी येत नव्हतं. ती घरात असून ती मात्र कोणाच्याच खिजगणतीतही नव्हती. आजही उभं राहता येत नसतानाही तिने थोडंस खाऊन कशीबशी भांडी घासली आणि उद्याच्या तयारीसह सगळं आवरून मुलाच्या बाजूला जाऊन धरणीवर पाठ टेकवली. 
                               

     आई ग! नकळत तिच्या तोंडातून बाहेर आलं आणि डोळ्यातून टपटप पाणी वाहू लागलं. मन आईभोवती गिरट्या घालू लागलं. लहान असताना आई वरण भात पोळी भाजी भरवण्यासाठी किती मागे पळायची. हाताला पकडून एका जागेवर बसवून भोपळ्याच्या,चांदोबाच्या किती गोष्टी सांगायची. चिडून म्हणायचीही कधी एकदाची मोठी होशील आणि स्वतःहून खाशील. दिवस भुर्रकन उडत मी मोठी तर झाले पण खाण्याचा त्रास आई मागचा सुटला नाही. हे नको ते हवंय..ते असच का तसच दे अस म्हणत तेव्हाही जेवणासाठी तिला खूप त्रास दिला. पण ती मायच शेवटी...जे मागेल ते करून दिलं... वेळप्रसंगी बाहेर जाऊन खायला पैसेही दिले पण उपाशी कधी झोपुच दिलं नाही. एकदा मैत्रिणीशी खूप मोठं भांडण झालं म्हणून रुसून बसलेले आणि जेवत नव्हते तेव्हाही आई म्हणाली होती तू नाही खाल्लंस तर माझ्या घशातून घास उतरेल का ग राणी... तेव्हा मात्र मी तावातावात बोलले होते माझं पोट ते तुझं आहे का?? तू तुझ्या पोटासाठी जेव...मी नाहीच जेवले तर उपाशीच राहशील का?? ती काही न बोलता पाणी पिऊन ताटावरून उठली...मी तसंच तिचा हात पकडून खाली बसवलं...तिने चार घास मला भरवले आणि मग स्वतः खाल्ले. त्यादिवसापासून आजपर्यंत कितीदा भूक नसली तरी मी जेवले कारण ती उपाशी झोपू नये म्हणून. 
                           
       किती लहान सहांन गोष्टीत ती मला जपायची. जेवण शिकताना हाताला थोडाजरी चटका बसला तरी ती हळहळायची...नको करू म्हंटल तरी का करतेस अस डोळ्यात पाणी आणून ओरडायची. जराजरी अंग गरम लागलं तरी रात्रभर मांडीवर घेऊन बसायची. ती इतकं सोन्यासारख जपुनही आपण मात्र तिलाच रागवायचो...तुला हे येतच नाही...तू अशीच आहेस...तशीच का नाहीस म्हणून घालून पाडून बोलायचो. ती नेहमी साठवलेल्या पैश्यातून स्वतःला साडी न घेता आपल्याला ड्रेस घ्यायची पण तरीही काही कमी पडलं की मी लग्न होऊन सासरी गेल्यावरच तुला माझी किंमत कळेल अस उलट  तिलाच ऐकवायचे. लग्नाची वेळ आली तेव्हा तीच जास्त खुश आणि तीच जास्त दुःखी होती. माझ्या पोटचा तुकडा,माझं काळीज मी तुम्हाला देते..तिला सोन्यासारखं जपा अस नवऱ्याच्या हातात हात देताना रडत होती. नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्या मला तिच्या त्या वाक्यांचा अर्थ तेव्हा कळला नव्हता पण हळूहळू चांगलाच उमगू लागला. 
      नवरा किंवा बाकी सासरची माणस कितीही प्रेमळ असली तरीही आईची जागा घेऊ शकत नाहीत. कधी जेवलीस किंवा का जेवली नाहीस म्हणून दटावून कोणी विचारत नाही. आज काय खायला हवंय की तुला काय आवडतं कोणीही विचारत नाही. आई आज हेच हवं असा हट्ट करणारी मी आज मात्र इथे स्वतःच्या आवडी निवडी विसरून सगळ्यांच्या आवडी निवडी जपते. माझ्या कपड्यांची,वस्तूंची सूत्रे आईच्या हातात सोपवणारी मी इथे सगळ्यांच्या वस्तू हातात आणून देते. हे वेळेवरच का नाही झालं म्हणत चिडचिड करणारी मी इथे सगळ्यांच्या जेवणासहीत औषधांच्या फिरण्याच्या वेळा पाळते. मी मात्र मला यात कुठेच दिसत नाही. किती दिवस झाले मी मलाच भेटली नाही....मला काय हवंय हे मलाच विचारण जणू विसरूनच गेले मी.
                             
       आता मी स्वतः एक आई झाले तेव्हा कळतंय आईचा जीव मुलासाठी कसा तीळतीळ तुटतो. आज त्याच्या पोटात घास गेल्याशिवाय माझ्या घशातून खाली उतरत नाही. त्याच्या सुखापलीकडे मला काही वेगळं दिसतही नाही. पण घरात इतकी माणसं असूनही 
रोज एकटी जेवताना, अंग दुखत असताना, फणफणत असताना, आवडीचा पदार्थ करताना, कोणी मन दुखावलं असताना , माझी मलाच शोधत असताना तू मात्र चेहऱ्यासमोर येतेस. निराशेत डोक्यावर हात फिरवायला आणि आजारपणात मायेने तूप भात भरवायला कोणी नसतं तेव्हा एकच विचारावं वाटत तुला सोन्यासारख जपलस लेकीला मग सासरी का पाठवलंस ग? 
     तुझ्याच जीवाला एकटीच ही लढाई लढायला शिकवलीस खरी...खंबीर स्त्री सोबत ती आज सक्षम आईदेखील झाली पण आजही ती तुझीच नाजूक,गोड, हळवी मुलगी आहे. तिन्हीसांजेच्या कातरवेळेत मन तुझ्या आठवणींत बैचेन होतं तेव्हा अल्लड मनात एकच प्रश्न उमटतो,
तुझ्यात अन माझ्यात दुरावा निर्माण करणारं हे सासर नावाची रीत जन्मास कोणी घातली ग??
                      भेगाळलेल्या जखमांवर
                       मायेची फुंकर हवी,
                       ओघळत्या अश्रूंना हि
                       तुझ्या हातांची साथ हवी,
                        कणखर शब्दांच्या सोबत
                        प्रेमाची ओल हवी,
                        सुखात हे आयुष्यं सरण्या
                         आई फक्त तुझी कुस हवी
      प्रत्येक माहेरवाशीणीची आपल्या जन्मदात्री बाबतीत होणारी मनाची घालमेल शब्दांत मांडायचा हा छोटासा प्रयत्न.  
           
                        

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुद्धीला.

    पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुध्दीला स्त्रियांच्या शिक्षणाचा, पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली, शाळा तू काढली दुसरी ओवी गाईली, तुझ्या ग धैर्याला दगडगोटे खाऊनी, चालवली तू शाळा घराबाहेर काढिले, गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले, सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग, तुझ्या मोठया मनाला फसलेल्या विधवेचा, सांभाळ तू केला अबला नि अनाथांचे, मायबाप होऊन यशवंत बाळाला, दत्तक घेतला चौथी ओवी गाईली, तुझ्या थोर हृदयाला माणुसकीचा झरा ज्यातं, नित्य ग वाहिला जोतिबांची सावली, नाही तू राहिली सत्यधर्म प्रकाशात, तेजानं तळपली दु:खितांच्या सेवेत, देह तू ठेविला स्मरण तुझे करुनी, वसा मी घेतला भगिनींना जागवीन, संघटीत करीन ज्ञानज्योत लावीन, हेच तुला नमन..                                      धन्यवाद...

मुलगी वाचवा देश वाचवा !

              आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत दिवसेंदिवसघटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिकआणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा आहे. पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपला देश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्यातुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष दयायला हवे. आपल्या देशातस्त्री-पुरूष समानतेचा फक्त गाजावाजा होतोय पण ती समानता प्रत्यक्षात आलेली कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळेच देशातील स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेतकमी होत चाललेली आहे. बालमृत्यू होण्याच्या घटनेतही मुलींच बालमृत्यू होण्याचप्रमाण अधिक आहे.   समाजात मुलींच्या संगोपनात हलगर्जीपणा केला जातो हे सत्यनाकारता येणार नाही इतकच नव्हे तर समाजातील काही घटकात मुलीला जन्म देणार्या आईचीही उपासमार होताना दिसते. आज ही आपल्या देशातील बर्याचश्या भागातील स्त्रियासुशिक्षीत सुसंस्कृत असतानाही पुरूषांच्या हातातील खेळणे झाले असल्याचे दिसतात त्यंच...

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले

                         राष्ट्रमाता  सावित्रीबाई फुले  क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या कन्यारत्न . १८४० साल महात्मा जोतीबा १३ वर्षाचे व सावित्रीआई ९वर्षाच्याअसतांना ह्या दोन तेजस्वी ज्योतींचा संयोग म्हणजेच त्यांचा विवाहझाला पुढच्या आयुष्यात दोघांच्या हातुन पुरोगामी,क्रांतीकारक,शुद्रातिशुद्रांच्या स्थितीत बद्दल, स्त्रीयांचे शैक्षणिक व सामाजिक जागृतीचे महान क्रांतिकारक कार्य १८४८ला मुलींन साठी आणी नंतर शुद्रांसाठी पहीली शाळा काढुन जोतीबांनी ज्ञानाचा दिप उजळला त्यातली ज्योत होते जोतीबा व तेल झाल्या सावित्रीआई आणी त्यांनी हा सारा भारत देशाला प्रकाशमान करुन उजळविले. महारवाडयात स्थापन केलेल्या शाळेत सगुणाबाई व सावित्रीआई कडुन शिक्षिकसेवेचे महान योगदान लाभले.सोबतच ज्योतीबांनी भिडे वाडयातल्या मुलींन च्या शाळेत त्यांना विनावेतन शिक्षिकेचे असे"पातक" कार्य करित होत्या.त्या शाळेत जातांना भट-ब्राम्हणा कडुन त्यांना छळले जाई त्यांना खडे,गोटे दगड ...