ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
सातही जन्म हाच पती मिळूदे तसेच पतीला दीर्घायुष्य लाभूदे म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. यमाला हरवून पतीचे प्राण परत मिळवणार्या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते.
पौराणिक कथेनुसार, भद्र नामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहीत राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहिती होते. त्यामुळे सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले.
सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता, सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमराज तिथे आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले. तिसरे वरदान मागताना, मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. यमराजाने नादात तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा